रत्नागिरी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांची त्यांच्या बालमैत्रीण डॉक सुषमा वायकुळ यांची अनपेक्षित भेट झाली. काही मिनिटांच्या ओझरत्या भेटीत दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. डॉक्टर सुष्मिता वायकुळ यांनी आपल्या बालमित्राला घरी भोजनाचंही आमंत्रण दिलं तसेच कोकणाचा मेवा सुद्धा त्यांना भेटवस्तू म्हणून दिला.
मुंबई येथे माहेर असलेल्या माहेरच्या डॉक्टर सुष्मिता वायकुळ आता सासरच्या डॉक्टर सुष्मिता दीपक विखारे. त्या राज ठाकरे यांच्या बालमित्र-मैत्रिणींपैकी एक आहेत. कोकणात चिपळूण येथेच वास्तव्य असलेल्या डॉक्टर सुष्मिता विखारे या बालपणीचा सवंगडी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी खास आल्या. चिपळूण येथे नवीन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यालयात दोघांची भेट झाली.
यावेळी डॉक्टर सुष्मिता यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोकणातले काजूही भेट दिले. यावेळी दोघांनी काही मिनिटं गप्पा मारत एकमेकांची आस्थेने चौकशी केली. राज ठाकरे यांनीही आपल्या मैत्रिणीची विचारपूस केली. डॉक्टर सुष्मिता यांचे पती दीपक विखारे यांच्याशीही संवाद साधला. इतकेच नव्हे तर सुष्मिता यांनी राज यांना भोजनाचे आमंत्रण दिले. मात्र यावेळी वेळ नसल्याने त्यांनी आपण पुढील वेळी नक्की येऊ असेही आपल्या बाल मैत्रिणीला सांगितले.
यावर बोलताना त्या म्हणाल्या की, आमचा ग्रुप आहे आणि राज ठाकरे या सगळ्या ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना नेहमीच भेटतात. नेहमीच आस्थेने चौकशी करतात. मात्र यावेळी आमच्या कोणत्याही राजकीय गप्पा, राजकीय चर्चा होत नाहीत” असेही डॉक्टर सुष्मिता विखारे यांनी स्पष्ट केलं इतकंच नव्हे, ही घरगुती भेट होती, बालमित्र म्हणून घेतलेली भेट होती, कोणत्याही प्रसिद्धीसाठी घेतलेली भेट नव्हती, असंही त्या बोलल्या.