महाराष्ट्रात दोन चाकी असलेले सरकार दोन आठवड्यापुर्वी तीन चाकी सरकार बनल्याने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करत सरकार केले. याच राजकीय घटनेची पुनरावृत्ती १० दिवसांपूर्वी झाली. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
तसेच अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. ज्यामुळे राष्ट्रवादीत देखील दोन गट निर्माण झाले आहेत. पण हे सर्व काही सुरू असताना राज्यातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना वेध लागले आहे ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे. या दोन्ही निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने सर्व राजकीय पक्षांनी मतदारबांधणीला सुरुवात केली आहे.
एकीकडे पक्षांनी, इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली असताना दुसरीकडे राजकीय सर्वेक्षणाचे अहवाल उघड होऊ लागले आहे. त्यामुळे २०२४च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कुणाची सरशी होणार? याबाबतचे पहिल्या टप्प्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकींच्या तारखा अद्यापही जाहीर झालेल्या नसल्या तरी दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेले सर्वेक्षणाचे अहवाल समोर आले आहेत. एक सर्वे झी न्यूज आणि मेटाराइजने तर दुसरा सर्वे हा टाईम्स नाऊ नवभारतकडून करण्यात आला आहे.
झी न्यूज आणि मेटाराइजने केलेल्या सर्वेनुसार, आज जर महाराष्ट्रात निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर एकनाथ शिंदे आणि भाजप (युती सरकार) गटाला १६५ ते १८५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय वातावरणात मतदारांनी भाजप आणि शिवसेनेला पसंती दिल्याचे उघड होत आहे. तर महाविकास आघाडीला १४५ जागा मिळू शकतात असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर राज ठाकरे यांच्या मनसेला २ ते ५ जागा व अपक्षच्या १२ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे.