काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील अकोला येथील पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याविषयी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवरून राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा वीर सावरकर यांच्या जन्मभूमीतही आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
या आंदोलनामध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे असे तिन्ही पक्ष सहभागी झाले आहेत. नाशिक येथील सावरकरांच्या जन्मभूमीपासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून यात कॉंग्रेस विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर सावरकर समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.इतकेच नाही तर, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. पुण्यात सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे. सारस बागेत सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावलेले बॅनर यावेळी फाडण्यात आले.
भाजपनेही पुण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले. आता पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आंदोलकांनी घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. भागुर येथे सावरकरांच्या जन्मस्थळी असलेल्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. यावेळी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक कर्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, काल राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचे पुरावे सादर केले आणि आज पहाटे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचे फ्लेक्स सारस बागेतील सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावले. त्यामुळे आता वाद आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.