शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर |
शिवाजी विद्यापीठामध्ये दर्जेदार मत्स्यालय उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी घोषणा करुन विद्यार्थिनींसाठी वसतीगृह, नावीन्यपूर्ण उपक्रम व कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांसाठीही राज्य शासनाच्या वतीने भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय डी. सावंत तर अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ गीताचे लोकार्पण करण्यात आले. या गीताचे गीतकार प्रा. गोविंद काजरेकर व प्रा. प्रविण बांदेकर व संगीतकार अमित साळोखे यांच्यासह गायक कलाकारांचा सत्कारही मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यापीठातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार अर्थशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रकाश शंकर कांबळे यांना देण्यात आला. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. आण्णा काका पाटील (कराड) यांना, तर कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉ. उषा बाहुबली पाटील (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची स्थापना करीत असताना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी छोट्यात छोट्या गावातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाची गंगा नेण्याचे स्वप्न बाळगले होते. यशवंतरावांचे ते स्वप्न विद्यापीठाने पूर्ण केलेच. शिवाय, विद्यापीठाचा लौकिक देश-विदेशांतही उंचावला. शिक्षण व संशोधनात शिवाजी विद्यापीठ आज अग्रेसर आहे. मात्र, विद्यापीठाची सामाजिक बांधिलकीही कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या कालखंडातील कार्य असो की महापूर काळात लोकांना दिलासा देण्याचे काम असो, विद्यापीठाने ही कामे अत्यंत आत्मियतेने केली. शिवाजी विद्यापीठाने गेल्या साठ वर्षांत शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर प्रगती केलीच, पण त्याच बरोबरीने सामाजिक बांधिलकीही प्राधान्याने जोपासली, असे गौरवद्गार त्यांनी काढले.
मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करण्याच्या दिशेने शिवाजी विद्यापीठाने काम करावे. या धोरणामधील विविध उच्च शिक्षणाच्या व कौशल्य विकासाच्या संधींचा विकास आणि लाभ विद्यार्थ्यांपर्यंत आणि व्यापक समाज घटकांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने काम करणे अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे डिजी लॉकरसारख्या नव तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थीभिमुखता विकसित करण्यासाठीही प्रयत्न करावेत.
शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक करून मंत्री श्री. पाटील म्हणाले, अलीकडेच शासनाने युनिसेफ समवेत एक महत्त्वाचा करार केला. याअंतर्गत जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा विकास करण्यासाठी बहुस्तरित प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून या सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने बोलताना मंत्री श्री. पाटील यांनी, शिवाजी विद्यापीठाने यासाठीचा सर्वंकष प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यासाठी लागणाऱ्या सर्व निधीची तरतूद ही राज्य शासनामार्फत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.