मनसेचे नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं.
संत मोरेंनी जाहीर नाराजी बोलावून दाखवल्यानंतर ते पक्षाला रामराम ठोकत नवीन पक्षात समील होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याचदरम्यान वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट लक्ष वेधत आहे. वसंत मोरेंच्या उपस्थितीत मंगळवारी काही महिलांनी मनसेत प्रवेश केला. खडकवासला विधानसभा मतदार संघात अनेक महिला भगिनींनी माझ्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याचं स्वत: वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे सांगितलं.
तत्पूर्वी, वसंत मोरेंनी जाहीर नाराजी बोलावून दाखवल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. वसंत मोरेंनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली. वसंत मोरे सातत्याने पक्षाची बदनामी होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत दोन दिवसांत विचार केला जाईल, असं मनसेनं ठरवल्याचे सांगण्यात येत आहे.