पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. शहरात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील तब्बल एक हजार रुग्णाचा मृत्यू हा तपासणी अहवाल येण्यापूर्वीचं किंवा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचं झाला आहे. असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच मृत झालेल्यांचे आकडे दर्शवले जात नाहीत. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ससून रुग्णालयात दररोज बारा आणि खासगी रुग्णालयात 50 रुग्णांचा मृत्यू होत आहे. दर महिन्याला चारशे पाचशे मृत्यू होतात, रुग्णाच्या क्ष किरण अहवालात रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात ससून रुग्णालयाने, केंद्रीय समितीने पुष्टी दिल्याचा दावाही महापौर यांनी केला आहे.”
“रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल मृत्यूनंतर येत असल्याने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून दाखवलं जात नाही”, असंही मोहोळ यांनी या बैठकीत सांगितले. विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.