अमरावती , २० ऑक्टोबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावती जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. तत्पूर्वी अमरावतीकरांचे श्रद्धास्थान अंबामाता आणि एकविरा मातेचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. तसेच, अमरावतीकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ दे, अशी पाटील आईकडे प्रार्थना केली. अमरावती जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारताना पोलीस आयुक्तालयास भेट दिली आणि आढावा घेतला.
२१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यानिमित्ताने अमरावती जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारताना चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तालयास भेट देऊन आढावा घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. पोलीस दलाला सक्षम करण्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा सातत्याने प्रयत्न आहे. यानुषंगाने पोलिसांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांची घरे अद्ययावत करण्यावर भर असेल, त्याशिवाय पोलिसांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास अमरावती परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, खा. अनिल बोंडे, खा.नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे, आ. रवी राणा, प्रताप अडसळ यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.