पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे नाव घ्यायलाही घाबरतात अशी जळजळीत टीका माजी मंत्री आणि काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केली आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारताचे सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यात झडप झाली होती. या झडपेत हिंदुस्थानी सैनिकांनी चिनी सैनिकांना पिटाळून लावलं होतं. चीन वारंवार हिंदुस्थानमध्ये घुसखोरीचे प्रयत्न करत असून या ताज्या घटनेबाबत मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत विस्ताराने निवेदन सादर केलं होतं. त्यांचे हे निवेदन पोकळ आणि रटाळ असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे. यासोबतच चिदंबरम यांनी पंतप्रधानांवरही टीका केली आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना चिदंबरम यांनी म्हटले की राजनाथ सिंह यांच्या विधानावर मी अजिबात संतुष्ट नाहीये, कारण ज्या गोष्टी वर्तमानपत्रात सकाळी 6 वाजता मला वाचायला मिळाल्या होत्या, त्याच गोष्टी संरक्षणमंत्र्यांनी दुपारी 12.30 वाजता सदनात सांगितल्या. सकाळच्या बातम्यांपेक्षा संरक्षणमंत्र्यांनी काय अधिकची आणि वेगळी माहिती दिली असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे.
चीन घुसखोरी करण्यासाठी तारीख, वेळ आणि जागा निश्चित करूनच हे प्रयत्न करतो आणि हे पहिल्यांदा झालेलं नाहीये. यापूर्वी चीनने 2020 मध्ये गलवान खोऱ्यातही हेच केले होतं. चीनला जी वेळ, जागा आणि तारीख सोईस्कर असते त्याचवेळी चीन घुसखोरी करत असतो. मग असं असेल तर तुम्ही ही घुसखोरी रोखण्यासाठी आतापर्यंत काय केलंय ? असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. या टीकेला सतत असलेली भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.