मुंबई | ठाकरे गटाची शाखा असलेल्या वांद्रा येथील शाखा पाडण्यात सहभागी असलेल्या मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी अजय पाटील यांना शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता अशातच आता महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी माजी परिवहनमंत्री आणि आमदार अनिल परब यांच्यासह ठाकरे गटाच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटकही केली आहे.
माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी सोमवारी आमदार अनिल परब यांच्यासह २५ ते ३० महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांसह सांताक्रूझ येथील एच पूर्व वॉर्ड येथे जनआक्रोश मोर्चा काढला होता. वॉर्ड अधिकारी स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासमोर या सर्वांनी पाण्याच्या समस्या आणि बेकायदा अतिक्रमणांच्या तक्रारी मांडल्या. त्यावेळी जलविभाग, इमारत, कारखाने, रस्ता सुरक्षा, मेंटेनन्स, एसडब्ल्यूएम तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठक सुरू असतानाच शाखा पाडण्याच्या कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या पाटील यांना बोलावण्यात आले. पाटील आल्यावर त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पाटील यांना सर्वांसमोर धमकीही देण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओची मदत घेतली जाणार असल्याचे परिमंडळ आठचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.