मुंबई : बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला असून अनेक नेते मंडळी सध्या BRS पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून BRS चे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी पंढरपूरमध्ये जात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीच्या चरणी ते नतमस्तक झाले.
या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि आमदार भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. बीआरएस पक्षाच्या राज्याच्या राजकारणातील एन्ट्रीवर आणि भाजपच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून करायला लागलेत. त्यांनी स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावं. बावनकुळे आणि हे भाजपची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काही नाहीये.
तसेच सगळं काही दिल्लीतून ठरवलं जातं. महाराष्ट्र भाजपची कमान ना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात आहे. सगळं काही दिल्लीतील नेते ठरवतात. त्यानुसारच पुढे सगळं काही घडतं, असं संजय राऊत म्हणालेत.