अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अल-जवाहिरीला लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला.या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी ठार झाला. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. ओसामा बिन लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे.
अल-जवाहिरीवर अमेरिकेने 25 दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता.
अयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1957 रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन असलेल्या अल-जवाहिरीचे अरबीसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व होते. जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद या संघटनेची स्थापना केली होती. 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष सरकारविरोधात संघटना आक्रमक भूमिका घेत होती. धर्मनिरपेक्ष सत्ता उलथवून इजिप्तमध्ये इस्लामिक राजवट कायम ठेवण्यासाठी जवाहिरीच्या संघटनेने उद्दिष्ट होते.
अल जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांची भेट सौदी अरेबियात झाली होती, असे म्हटले जाते. ओसामा बिन लादेन 1985 मध्ये अल कायदा संघटना वाढवण्यासाठी पाकिस्तानमधील पेशावर येथे गेला होता. त्यादरम्यान जवाहिरीदेखील तिथेच होता. त्यानंतर लादेन आणि जवाहिरी यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली.