मुंबई | एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा म्हणून ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईत सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याचं कळत आहे. सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचं कळत आहे. त्यानंतर आता राज्यातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबईत एक धोकादायक व्यक्ती फिरत असून त्यासंदर्भात माहिती देणारा ई-मेल एनआयएकडून मुंबई पोलिसांना करण्यात आला आहे. NIA कडून मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएकडून ई-मेल आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरु आहे.
NIA ने आपल्या ईमेलमध्ये ‘धोकादायक’ या शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहायला सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने आपल्या ई-मेलमध्ये संशयित व्यक्तीचं नाव सरफराज मेमन असल्याचं सांगितलं असून ही व्यक्ती मुंबईत पोहोचली असल्याचं एनआयएने ई-मेलमध्ये म्हटलं आहे. मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी आहे.
तसेच या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच धोकादायक ठरु शकते, असंही एनआयएने म्हटलं आहे. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रही पाठवली आहेत. मेलसोबत NIA ने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे.