Latest Marathi News

BREAKING NEWS

मोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवसचा हॅशटॅग होतोय ट्रेंड

0

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भारतात रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi असे हॅशटॅग्स ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.

मात्र याचबरोबरीने #NationalUnemploymentDay आणि #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हे दोन हॅशटॅग नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ट्रेंड होत आहेत. याची पार्श्वभूमी तपासली असता, देशात रोजगाराची वाणवा आहे. मोठ्या संख्येने तरुण वर्ग रोजगारासाठी बाहेर पडतोय, लहान लहान पदांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येत आहेत. कोरोना संकटकाळात भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगारासंबंधी समस्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी असे विषय ट्रेंड होत आहेत.

एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये मायनस 23.9 टक्क्यांपर्यंत झाली आहे. गेल्या 40 वर्षातली ही मोठी घसरण आहे.एवढेच नव्हे तर भारताचा शहरी बेरोजगारीचा दर गेल्या आठवड्यात 8.32 टक्क्यांवर आला आहे

सेंटर फॉर इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार, लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर महिन्याभरातच सुमारे 12 कोटी लोकांनी रोजगार गमावला होता. सीएमआयई नुसार, संघटित क्षेत्रातील वेतनावर काम करणाऱ्या 1.9 कोटी लोकांनी लॉकडॉऊन दरम्यान आपली नोकरी गमवली आहे.आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने तरुण वर्ग सरकार विरोधात आपली नाराजी सातत्याने व्यक्त करत आहेत.

याआधी कोव्हिडमध्ये जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग, पोलीस या सर्वांचे आभार मानण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर विध्यार्थ्यांनी 9 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी देशाच्या विविध भागांतील तरुणांनी मशाल हातात घेऊन, मोबाईल फ्लॅश आणि दिवे पेटवून आंदोलने केली.

मागच्या वेळी जेंव्हा नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये जेंव्हा देशातील लोकांशी संवाद साधला होता, त्यात बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था यावर भाष्य केले नव्हते. त्यामुळे त्यांना यूट्यूब वर मोठ्या प्रमाणात डीसलाईक्स मिळाल्या होत्या.

त्याच्याही पुढे जात विविध विद्यार्थी संघटना 17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस असा ट्रेंड चालवून सरकारच्या कारभाराविरोधात निषेध नोंदवत आहेत. विविध संघटना आणि विरोधी पक्षाकडून या मोहिमेला समर्थन दिले जात आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हे काँग्रेसचे षडयंत्र आहे आणि याला तुर्की बॉट्सला जबाबदार असल्याचे सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.