वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यभरात मोठा गदारोळ निर्माण झाला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटले आहे. सदर प्रकल्प राज्याच्या हातातून निसटल्याने लाखो तरुणांची नोकरीची संधी हिरावली गेल्याने सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. अशातच आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या तरुणांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांना तरुणांच्या आक्रमक घोषणाबाजीचा सामना करावा लागला. पोलीस भरतीच्या मागणीसाठी तरुणांकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचंही पाहायला मिळालं.
‘गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया केली जात नाही. परिणामी तरुणांसमोर रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ही भरती करावी,’ अशी मागणी आंदोलनकर्त्या तरुणांनी केली आहे. यावर आता शिंदे-फडणवीस सरकार काय निर्णय गेले हे पाहावे लागणार आहे,