सरकारी अधिकारी लाच घेत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यातील रोख रक्कम 2 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेले आहे. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली.
दरम्यान, तीन महिन्यापूर्वी 10 मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. आल्या पासूनच त्यांनी शहरातील बांधकाम व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याच्या तक्रारी सुरू होत्या.
सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून खानापूर रस्त्यावरील विश्रामगृहावर विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांची लाच लुचपत विभागाच्या मार्फत कसून चौकशी सुरू आहे. यात अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. कारवाईनंतर बांधकाम व्यवसायिक आणि नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.