Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून एकनाथ खडसेंनी लगावला टोला

0

जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा आहे. या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह संपूर्ण शिंदे गटाला चांगलेच चिमटे काढले. मी दर तीन चार वर्षातून कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो, आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. परत आमचं सरकार येऊ दे, असं साकडं घालणार असल्याचं खडसेंनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर इंथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खडसे बोलत होते. यावेळी खडसेंनी टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 40 बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी असल्याचा चिमटा देखील खडसेंनी यावेळी काढला. मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. पुन्हा तेच हॉटेल, तीच झाडी, तीच डोंगर असे म्हणत खडसेंनी टोला लगावला.

मला पण इच्छा होते की आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे असे खडसे म्हणाले. मी तसं दरवर्षी कोलकातामध्ये दर्शनाला जातो. तसेच दर तीन चार वर्षांनी मी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातो असे खडसे म्हणाले. आता मलाही वाटत आहे की कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये जावं आणि त्या मातेला सांगाव की 50 खोके माझ्याकडे नाहीत. पण 50 लोक मला आशिर्वाद देणारे आहेत. पुन्हा आमचं सरकार येऊदेत असेही खडसे यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.