अरुण गवळी याचा मुलगा योगेश गवळीचा विवाहसोहळा काल संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. योगेश अरुण गवळीच्या लग्नाला उपस्थिती लावून नार्वेकरांनी त्याला शुभेच्छा दिल्याची माहिती आहे. शिवसेना नगरसेवक खून प्रकरणातच अरुण गवळी शिक्षा भोगत आहे.
सध्या अरुण गवळी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने पॅरोलवर तुरुंगाबाहेर आले आहे. मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मागितला असता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला मंजुरी दिली आहे. अरुण गवळीला चार दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. या रजेत पोलीस सुरक्षेसह अरुण गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आली होती. त्यासाठीचा खर्च स्वतः गवळीला करावा लागणार होता.
दरम्यान शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईमधील असल्फा भागात २ मार्च २००७ रोजी कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी अरुण गवळीला २००८ मध्ये अटक केली होती. २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.यातच गवळी याच्या मुलाच्या लग्नात मिलिंद नार्वेकर उपस्थित झाल्याने त्याच्या चर्चा रंगल्या होत्या.