मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले. मूळ शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाल्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा खेळ रंगला आहे. मात्र, अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे उद्धव ठाकरे गट खिळखिळा झाला आहे. तर पदाधिकारी सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसताना दिसून येत आहे.
अशातच ठाकरे गटाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे आमने-सामने येणार आहेत. आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे.
या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची सिनेट निवडणूक चुरशीची होणार आहे. सिनेट निवडणुकीतसुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनीही या निवडणुकीसाठी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाचे पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतली.