ठाणे | एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत युती केल्यानंतर मोठा संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळाला होता. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या शिवसेना उपविभाग प्रमुखाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. रवींद्र परदेशी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. तर फेरीवाल्यांच्या वादातून टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. रवींद्र परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र परदेशी यांचा ठाण्यातील मुख्य बाजार पेठेत त्यांचा कटलरीचा व्यवसाय होता. परदेशी हे त्यांचे काम आटपून घरी जात होते. यावेळी गाडीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात परदेशी यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत झाला. काही नागरिकांनी दवाखान्यात भरती केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. अंतर्गत वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे.