एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याविषयी संकेत दिले. “एका देशात दोन कायदे असतात का?” असा प्रश्न विचारत त्यांनी लवकरच हा कायदा भारतात लागू होणार असल्याचे अघोषित मान्य केले. दरम्यान, त्यांनी छेडलेल्या समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून अनेक मतमतांतरे होत आहेत. तर, ठाकरे गटाने या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आजचा सामनातून ठाकरे गटाने यावर भाष्य करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.
न्यायाच्या बाबतीत समानता ठेवणे हासुद्धा समान नागरी कायदा आहे. विरोधी पक्षांतील लोकांना भ्रष्टाचारविरोधी कायद्याने अडकवायचे, पण स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना, मंत्र्यांना अभय द्यायचे, हा कोणता कायदा? ‘स्वतःचा तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे’ अशा प्रकारचा ‘दुहेरी’ कायदा सध्या देशात राबवला जात आहे व पंतप्रधान मोदी भोपाळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करीत आहेत, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे. हे ढोंग आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
आधी भिवंडीत नगरसेवकांना अपात्र ठरविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह ४० बेइमान आमदारांना स्वतःच अपात्र घोषित करून मोदी यांनी पुकारलेल्या समान नागरी कायद्याचा मान राखावा. अध्यक्ष महोदय, तुम्हाला हेच अपेक्षित आहे ना? असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. पंतप्रधान मोदी एक बोलतात, पण त्यांचे अंधभक्त किंवा टाळकुटे नेमके वेगळे करतात. हे आता नित्याचेच झाले आहे.
मोदी यांनी काल भोपाळ येथे देशाला प्रश्न केला, ‘एका घरात कधी दोन कायदे असतात का? अशी दुहेरी व्यवस्था देशात बरी नाही!’ मोदी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. निवडणुका जवळ आल्याने मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे समान नागरी कायद्याला हात घातला. एकाच देशात दोन कायदे असूच नयेत, पण ‘एक देश दोन कायदे’ हे मोदींच्याच राज्यात निर्माण झाले. म्हणजे एक देशाचा कायदा आणि दुसरा हम करे सो कायदा!, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
महाराष्ट्रात ४० आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या बासनात गुंडाळून ठेवले आहे. शिवसेनेचा आदेश झुगारून मतदान करणाऱया मिंधे गटाच्या ४० आमदारांना घटनेच्या १० व्या शेड्युलप्रमाणे अपात्र ठरवावेच लागेल असे कायदा सांगतो, पण या बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ शर्थ करीत आहे.
आता आपल्याच देशातला दुसरा कायदा पहा – भिवंडी महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत ‘उठाव’ करून काँग्रेसचा पक्षादेश डावलून विरोधी कोणार्क आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणाऱया काँग्रेसच्या १८ तत्कालीन नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. त्या नगरसेवकांवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदीही घातली. हे प्रकरण म्हणजे ‘एक देश दोन कायदे’ असेच नाही काय? अशी विचारणा ठाकरे गटाने केली.