मुंबई | अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती.या विनंतीची दखल घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि शिंदे गटाला पोटनिवडणुकीसाठी वेगवेगळी नावं आणि चिन्हांना मान्यता दिली. पण त्यानंतर शिंदे गटाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारच उभा केला नाही. याउलट भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला. या मुद्द्यावरुन शिंदे गटावर टीका केली जात आहे.
पण शिंदे गटाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार का उभा केला नाही याबाबत मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे. “विरोधकांकडून आमच्याकडून अंधेरी पोटनिवडणुकीत टारगेट करण्याचा प्रयत्न होतो असा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने पक्ष, नाव, चिन्ह हे दिलं मग उमेदवार का दिला नाही? असे विचारले जात आहे.
धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने आम्ही अंधेरी निवडणुकीत उमेदवार न देता भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे” असं उदय सामंत म्हणाले. “ठाकरे गटाला मशाल ही निशाणी मिळाली. पण त्यांनीच धनुष्यबाण गोठविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावे यासाठी लढाई सुरु राहील. चिन्ह न मिळाल्याने आम्ही ही नाराज आहोत”, अशी भूमिका सामंत यांनी मांडली.