शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता लगेचच देवेंद्र फडणवीस कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. मुंबई मेट्रोसह जलयुक्त शिवार योजनेच्या कामासंबंधीचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी अधिकारी, सचिव यांच्याशी संवाद साधण्यात आला. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया.
तसेच मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही योजनासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत कायम संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरे येथे मेट्रोचे कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. तेथे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेचा विरोध असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड होईल, असे निर्देश दिले. मात्र, या जमिनीवर केंद्र सरकारने दावा केला.
यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. यानंतर आता, आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे सूत्रांनी सांगितले.