मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात झालेल्या दुर्दैवी घटनेतील चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार व हत्या करणारा आरोपी हा व्यसनाधीन होता. अशा संतापजनक घटना टाळण्यासाठी पिढीत मृत मुलीला खरा न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने गावागावातील अवैध दारू धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली.
अवघ्या महाराष्ट्राचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या कोथुर्णे येथील घटनेचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. पीडित चिमुकलेला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार शेळके यांनी थेट विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवल्यामुळे पिडीतेला लवकरच न्याय मिळेल,अशी आशा निर्माण झाले आहे. कोथुर्णे गावात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील चिमुकलीला न्याय द्यायचा असेल तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली.
या दुर्दैवी घटनेमागे गावा-गावात सुरू असलेले अवैध दारू धंदे देखील कारण आहेत. या दारू धंद्यांनी अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत आणि तरी देखील गावात दारू धंदे सुरू राहत असतील तर ते दुर्दैव आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गावा गावांमध्ये वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत, मात्र प्रत्येक गावात दारू धंदे आहेत. जर या दुर्दैवी घटनेतील चिमुकलीला न्याय द्यायचा असेल तर गावा-गावांतील अवैध दारू धंदे पण बंद करावेत,अशी मागणी आमदार शेळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.