जालना | माझ्याबद्दल काही तपास सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझ्या मतदारसंघातील कामे प्रलंबित आहे. अडचणीत असलेला माणूस आधार शोधतो. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यानंतर तू निर्णय घेऊ शकतोस असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पाठिंबा देत असल्याचं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले.
खोतकर म्हणाले की, माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले. माझी जी परिस्थिती आहे त्यांच्या कानावर सगळं घातलं आहे. जिल्ह्यातील नेत्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. ४० वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. परंतु काही निर्णय घेणे अपेक्षित होते. याबाबत पक्षप्रमुखांना मी कळवलं. मी सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थितीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच १९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली. यामध्ये मी एकटाच नाही तर सर्व सहकारी या सर्वांनी मिळून जालना जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवलं. सामान्य माणसांपर्यंत घेऊन गेलो आणि सामान्य माणसानेही तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यात लोकांनी आमच्या पदरात यश टाकलं. त्याबद्दल मी लोकांचे आभारी आहे असं अर्जुन खोतकर यांनी सांगितले.