Latest Marathi News

BREAKING NEWS

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा धडकणार, या संघटनेने दिला इशारा

0

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मराठा संघटना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने सोडवावा, अन्यथा येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मंत्रालयावर लाखांचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी केली होती. त्यासाठी राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलनही छेडण्यात आले. त्यांच्या निधनानंतर याच मागणीवर संघटना आग्रही राहिली असे जावळे म्हणाले.

अनेकदा मागणी करूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे नव्या सरकारने आमचा अंत पाहू नयेत. मराठा समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी आमची मागणी आहे. याच मागणीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात दौरे काढून नोव्हेंबरमध्ये मंत्रालयावर लाखांचा मोर्चा काढला जाईल, असा इशारा जावळे यांनी यावेळी दिला.

समाजाच्या नावावर कोण खासदार, तर कोण आमदार होतेय, राजकीय स्वार्थासाठी केलेली ही समाजाची फसवणूक आहे, अशी टीका जावळे यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख न करता केली. तर तरुणांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून प्रचंड रोष आहे. त्यामुळे सरकारने आमचा अंत न पाहता लवकर यावर तोडगा काढावा असा इशाराही जावळे यांनी यावेळी दिला

Leave A Reply

Your email address will not be published.