बोगस शपथपत्राच्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापूरात तपासासाठी दाखल झाली. ठाकरे गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बोगस शपथपत्रे सादर केल्याचा आरोप आहे.मुंबईत माहिम परिसरात पोलिसांनी धाड टाकून बनावट स्टँम्प जप्त केले होते. या प्रकरणावर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारविरोधात गंभीर आरोप केला.
संजय पवार म्हणाले की, आमच्याकडे १० विधानसभा मतदारसंघात ज्या सूचना आल्या त्याप्रमाणे प्रामणिकपणे स्टँम्प घेऊन नोटरी करून प्रतिज्ञापत्रे सादर केली आहे. आता कुणी खोडसळपणाने याबाबत तक्रार केली असेल तर त्याबाबत आमचा नाईलाज आहे. शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्रे सादर केलीत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही. सरकारी कामकाज आहे. त्यांच्या कामात आम्ही अडथळा आणणार नाही. आम्ही चुकीचं काही केले नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच तपासात काही चौकशी करायची असेल तर आमची तयारी आहे. कोल्हापूरातून माझ्या मतदारसंघातून १४८० प्रतिज्ञापत्रे सादर केलीत. ज्या जिल्ह्यातून सरकारविरोधात जास्त आंदोलन होत आहेत. त्याठिकाणी दबावाचं राजकारण सुरू आहे. परंतु आमचा कारभार स्वच्छ असल्याने जे काही चौकशी करायची असेल ते करू द्या आम्ही सहकार्य करू अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी घेतली आहे.