भाजप नेते अमित शाह यांनी मध्यस्थी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्ताराचा गुंता सुटला आहे. त्यामुळे उरलेल्या मंत्र्यांचा आज किंवा उद्या शपथविधी होण्याची शक्यता असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नव्या विस्तारात एकूण 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी चार तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश असणार आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चार जणांची नावे फिक्स झाली आहेत. या चारही जणांमध्ये पुरुषांचाच समावेश आहे. मात्र यात मनीषा कायंदे आणि निलम गोऱ्हे यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये.
नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. 4-4-2 असा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपत घेणाऱ्या चौघांची नावे फिक्सही झाली आहेत. यात भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. म्हणजे नव्या विस्तारात कोकणातून दोघांचा तर पश्चिम महाराष्ट्रातून एकाचा समावेश केला जाणार आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटासाठी फुल्ल बॅटिंग करणारे आणि ठाकरे गटाला अंगावर घेणारे शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगितलं जात आहे. संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर या दोघांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. शिरसाट आणि रायमूलकर या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिपदाची रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहावे लागणार आहे.