Latest Marathi News

BREAKING NEWS

मणिपूर प्रकरणाच्या मुद्दयावरून महाविकास आघाडी पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला करणार विरोध !

0

मणिपूर प्रकरणाच्या मुद्द्यांवरून देशातील राजकारण तापले असून विरोधकांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे तसेच याच मुद्दयावरून संसदेतील अधिवेशन सुद्धा चांगलेच गाजले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित करण्यात आला आहे. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला महाविकास आघाडीने विरोध केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला आहे. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन परिस्थिती पाहावी आणि चर्चा करावी या मागणीसाठी आम्ही हा विरोध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. या दौऱ्याला आंदोलन करुन महाविकास आघाडीकडून विरोध केला जाणार असून इंडिया आघाडीमधील सगळे पक्ष मोदींविरोधात एकत्र येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याआधी कॉंग्रेसकडून नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यावरुनही विरोध दर्शवला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.