राज्याच्या राजकारणात साडेतीन वर्षात तिसरा भूकंप काल झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तत्पूर्वी त्यांनीही शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. अशातच मागच्या अनेक दिवसांपासून अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर काल सत्यात उतरली यावर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया येत असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोनालीने आपल्या चाहत्यांना इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून राज्यातील राजकीय घडामोडींविषयी प्रश्न विचारला. ”पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?” असा प्रश्न विचारतं रिअॅक्ट बारमध्ये ‘मजाक’ लिहित ही स्टोरी शेअर केली आहे. सोनाली कुलकर्णीशिवाय तेजस्विनी पंडित, सुबोध भावे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी अनेक मराठी कलाकारांनी आज घडलेल्या राजकीय घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी त्यांचं मत मांडलं. “महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार… (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो….)”, अशी पोस्ट सचिन यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे