मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर त्यांच्या मुंबई येथील घराबाहेर काही दिवसांपूर्वी झळकले होते आता यांच्यापाठोपाठ आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत.या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हे होर्डिंग लागलं आहे. “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…, एकच दादा, एकच वादा, अजित दादा…” अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे.काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांचे काही पोस्टर्स मुंबईत झळकले होते. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्यामुळे राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगू लागली. यावर आता शरद पवार काय भाष्य करतात हे सुद्धा पाहावे लागणार आहे.