मराठा आरक्षणाचा मुद्धा सुटलेला नाहीये अशातच जिल्ह्या-जिल्ह्यात आता मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघताना दिसून येत आहे अशातच मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.अशातच राज्य सरकारने दोन जीआर काढले. पण एकाही जीआरने मराठा समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
एकीकडे जोराने जरांगे यांचे आंदोलन तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसींनी विरोध केला आहे. ओबीसी नेत्यांनीही थेट आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा नेत्यांनी थेट मराठा नेत्यांनाच इशारा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर एकवेळ रामदास आठवले यांना मदत करू, पण मराठ्या नेत्यांना पराभूत करू, असा इशाराच मराठा समाजाने दिला आहे. तसेच महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्या, असा इशाराही मराठा नेत्यांनी दिला आहे.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी हा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. जर त्यात अपयश आलं तर समाजातील नेत्यांना आम्ही कुठेही फिरू देणार नाही. त्यांना निवडून येऊ देणार नाही. रामदास आठवलेंना मदत करू पण त्यांना मदत करणार नाही, असा इशारा दिलीप जगताप यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाने आरक्षण दिल तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहू. पण ओबीसींना उभं करायचं आणि मराठ्यांमध्ये दोन भाग करून दरी निर्माण करायची हे करू नका. हे परवडणारं नाही महाराष्ट्रात मणिपूर करू नका हे आमची विनंती आहे, असं आवाहन दिलीप जगताप यांनी केलं. मणिपूर लहान होतं. महाराष्ट्र खूप मोठा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे टाळता येईल तेवढ टाळा अशी माझी विनंती आहे, असा इशाराही त्यांनी दिला.