‘नॅटकॉन २०२३’ या ३९ व्या राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे, ९ सप्टेंबर : नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) या मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतर्फे आणि एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘नॅटकॉन २०२३’ या ३९ व्या राष्ट्रीय शिखर परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोप प्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला.
या परिषदेत देश-विदेशातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचे एक हजारांहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापकांनी सहभाग घेतला. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण त्यासोबतच उद्योग क्षेत्रांसाठीही इथे नेहमीच पोषक वातावरण राहिले आहे. यासोबतच मनुष्यबळ विकासातही पुणे हे अग्रस्थानी राहिले आहे. त्यामुळे या अनुषंगाने पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाचेच स्वागत आहे, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले. नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे जर्मनीला गेले होते. तर जर्मनीमधून अशी रिक्वायरमेंट आली आहे कि, ४ लाख तरुण वेगवेगळे स्किल्स घेऊन इथे यावेत. यासाठी सहा मंत्र्यांचा एक ग्रुप करण्यात आला आहे. जे या तरुणांची निवड करून त्यांना तेथे पाठवतील, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. इंडस्ट्रीच्या मागणीनुसार वेगवेगळे कोर्सेस डेव्हलप करण्याची देखील आपण तयारी करत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.