राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणा नंतर दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने जाती जातीत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त खोटे, गैरसमज पसरवणारे, जातीय सद्भाव खराब करणारे आणि काही समाज घटकांचा अपमान करणारे असल्याने लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, नागपूर आवृत्तीचे राजेश्वर ठाकरे आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून लोकसत्ता व या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्या विरुद्ध अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात शुक्रवारी 7 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शास्त्रांचे आणि रिवाजांचे दाखले देत आपल्या देशात जातीभेद नसल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे वृत्त लोकसत्ता या दैनिकाने 8 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित केले.
या बातमीत डॉ. मोहन भागवत यांनी न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालण्यात आले. ” ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे” असे कुठलेही वाक्य डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले नाही. ते न बोललेले त्यांच्या तोंडी हेतुपुरस्सर घालण्यात आले आणि बातमीत छापण्यात आले. संघविरोधकांनीही चिंतन करावे असे ते भाषण होते. संविधानाने अंगिकारलेल्या जातीरहित समाजाचा स्वीकार हेच भारताचे भविष्य असावे हे त्यांनी ठासून सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचे समाजातून स्वागत झाले.
मात्र, लोकसत्ता या दैनिकाने डॉ. भागवत यांच्या सुधारणावादाविषयी गैरसमज होणारे वृत्त प्रकाशित केले. ज्या शब्दांचा डॉ. मोहन भागवत यांनी उल्लेख केला नाही, ते त्यांच्या तोंडी घालून एका समाजाला दुखावले, अपमानित केले आणि इतर समाजाच्या रोषास कारण निर्माण केले. सामाजिक सद्भाव खराब केला. लोकसत्ताने असे वृत्त जाणीवपूर्वक प्रकाशित केले, या आशयाची तक्रार शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्याकडे दिली होती. त्यानंतर आज बडनेरा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.