मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारतीच्या वतीनं आयोजित लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेस केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी त्यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात मा. लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यपाल तथा मुंबई विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार चळवळीने कालानुरुप स्वताला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही कालबाह्य होणार नसून या चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे अमित शहा यावेळी म्हणाले.