राज्यात सर्वत्र पसरलेल्या लंपी आजाराची दहशत मुंबईतही पसरली आहे. जनावरांतील लंपी या त्वचारोगाचा फैलाव होऊ नये म्हणून आता मुंबई पोलिसांनीच खबरदारी घेतली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर मंदिराबाहेर गाय उभी करण्यास तसेच मिरवणुकांमध्ये बैलगाडीचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात प्राण्यांना लंपी त्वचारोगाची लागण होत आहे. या रोगाला रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागदेखील विविध उपाययोजना करत आहे. मुंबईत लंपी त्वचारोगाचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. शहरात अनेक ठिकाणी गोठे आणि तबेले आहेत. काही मंदिरांबाहेर गाई उभ्या केल्या जातात.
तसेच धार्मिक मिरवणुकांमध्ये बैलगाडीचा वापर केला जातो. लंपीचा फैलाव होऊ नये म्हणून प्राण्यांना गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी नेण्यास मनाई असणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगर भागात म्हशी, गाई, गुरे आणि इतर जनावरे पाळली जातात. त्या लोकांनी त्यांचे प्राणी कोठेही नेऊ नयेत. त्या प्राण्यांना जर त्वचारोगाची लागण झाली तर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राण्यांची वैरण, गवत, त्यांच्या संपर्कात आलेले किंवा प्राण्यांचे शव किंवा कातडी हे कुठेही नेऊ नयेत अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत सूचनांचे पालन करावे लागणार आहे.