शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिली नसली तरी शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित केले असल्याचे दिसून आले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘आतुरता उध्दवसाहेबांच्या गर्जनेची’ असे ते पोस्टर सोशल मिडियावर झळकले आहे.
सत्तांतर झाल्यानंतर होणाऱ्या या मेळाव्यात विरोधीपक्ष भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: शिंदे गटावर तोफ डागली जाणार सर्वश्रृत आहे. आता फक्त उद्धव ठाकरे कोणत्या पद्धतीने बोलणार, कोणते शब्द वापरणार, हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे यामुळे सर्वांच्या नजरा दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे काय बोलणार यंताकडे लागल्या आहेत.
दसरा मेळाव्यासाठी जागेचा प्रश्न असताना, मात्र शिवसेनेने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. शाखाप्रमुख तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पुढील आठवडय़ात संपन्न होणार असून राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.