पुणे | कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये कपर्दर लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच आता मोठा ट्विट्स पाहायला मिळत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या मदतीला धावले आहे. मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे आणि बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी मनसेची हीच भूमिका राहणार आहे.
या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही. मात्र, मनसे मतदानामध्ये भाजपला मदत करणार असल्याची चर्चा मनसे आणि भाजपच्या वरिष्ठ स्तरावर झाली आहे. मात्र, मतदानाच्या पातळीवर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.तसेच या निवडणुकीमध्ये भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती मनसेचे नेत्यांनी दिली आहे.
भाजपचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ यांनी आज मनसे कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेच्यावतीने बाबू वागसकर यांनी ही पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यावर आता महाविकास आघाडी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.