मागच्या काही दिवसांपासून राजकीय पडूहर्यांवर हल्य्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता उस्मानाड येथील अशीच ए, घटना समोर आली आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मनीषा पाटील यांच्यावर वाड्यांत व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात त्या थोडयात बचावल्या आहेत.
सदर घटनेत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचतगटाच्या टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांचा हल्ल्यामागे हात असल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरात बुधवारी संध्याकाळी चेहरा कपड्याने बांधलेल्या अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. हातात चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्यावर धारदार चाकूने वार करून खूनी हल्ला चढवला. परंतु प्रसंगावधान राखून पाटील यांनी तो वार हातावर झेलला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या घरातील लोकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर मात्र पसार झाला होता. जखमी अवस्थेत नागरिकांनी पाटील यांना आनंदनगर पोलीस ठाण्यात आणले. तिथून जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला बचत गटाच्या पोषण आहार वाटपाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता केल्याच्या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारी आणि आझाद मैदानावर केलेल्या उपोषणामुळे महिला आणि बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निपाणीकर हे अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांच्यावरच दाट संशय असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.