ठाण्यात रोशनी मोरे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘फडतूस’ या शब्दाचा वापर केला होता. आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते नागपुरात सावरकर गौरव यात्रेत बोलत होते आता या टीकेवर शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“छत्रपती शिवरायांच्याबद्दल प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, भगतसिंग कोश्यारी यांनी असभ्य भाषा वापरली. पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, प्रशांत परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत. पण फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. या टीकेमुळे येणाऱ्या दिवसात उद्धव ठाकरे गट आणि भाजपात वाद होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे,