सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावांवर आमचा दावा आजचा नाही. त्यामुळे त्याबाबत मी केलेले वक्तव्य चिथावणीखोर नाही. जे रास्त आहे ती मागणी मी केलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.सीमाप्रश्न राज्य निर्मितीपासून सुरू आहे. महाराष्ट्राने सातत्याने यासंदर्भात आपली भूमिका पक्की ठेवली आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय योग्य भूमिका घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे कानडी सरकारला आता महाराष्ट्रातून विरोध होऊ लागला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुक्याच्या वतीने शहीद भगतसिंग चौक, दौंड येथे कर्नाटक सरकारची निपाणी-संभाजीनगर बस अडवून कर्नाटक सरकारचा, मुख्यमंत्री बोम्मई यांचा जाहीर निषेध करण्यात आला. निपाणी – संभाजीनगर बस अडवून ड्रायव्हर कंडक्टरला भगवा पंचा घालून व बसवर निषेधाचे फलक लिहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.