Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्मवीर डॉ. मामासाहेबांचे सच्चे शिलेदार ज्ञानतपस्वीकार व.न.अिंगळे अनंतात विलीन

0

प्रतिनिधी: बार्शी
बार्शी येथील कर्मवीरनगरमध्ये वास्तव्य असलेले श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव व माजी प्राचार्य व.न. अिंगळे यांचे निधन झाले व बार्शीतील एका साहित्यकाराचा जीवनप्रवास थांबला मात्र त्यांचे लेखन अजरामर झाले. कर्मवीर विचारांना स्मरून कार्यप्रवण होताना त्यांच्यातला शिक्षक नेहमी तपस्वी राहिला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी बी.पी .एस. कॉर्मर्स कॉलेज, बार्शी व श्री शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची धुरा सांभाळताना त्यांनी विद्यार्थीहिताचा विचार केला.इंग्रजी भाषेचे मर्म ओळखून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजीतील वर्म ओळखले व अगदी सोप्या भाषेत उपयुक्त व्याकरण व संभाषण लेखन केले. इंग्रजी भाषेचे उच्चारण समजण्यास उपयुक्त ग्रंथांची निर्मिती केली. समता, सूर्यदर्शन, जीवनसंग्राम, शिवाजीयन या नियतकालिकांचे संपादन केले. कर्मवीर मामांच्या विचारधारेचा त्यांच्यावर विशेष प्रभाव जीवनभर राहिला. अिंगळे सरांच्या दूरदृष्टीने व लेखनसंपदेने महाराष्ट्रात कर्मवीर मामांच्या साहित्याचा मानदंड घातला. कर्म हीच आराधना(Work is worship) हे त्यांच्या जीवनाचे तत्व राहिले. त्यांच्या शब्दांमधून व कृतीमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असे. माझ्या ‘कर्मांजली’ या काव्यसंग्रहासाठी अभिप्राय देताना ते मला म्हणाले होते, “पालके , तू चांगले लिहितो.तुझे लेखन मला वाचायचे आहे.” कर्मवीर व कर्मावर त्यांची अगाध श्रध्दा होती व त्यामुळेच शेवटपर्यंत त्यांच्या हातातील लेखणीने शब्दांना आकार दिला व त्यातून माणूस घडविला. ग्रंथांनीच त्यांना घडविलेले होते व कर्मानेच ते कर्मवीरांचे शिलेदार ठरले होते. महापुरुषांच्या विचारधारेचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर विशेष प्रभाव पडला होता. स्वामी विवेकानंदांचे चरित्र रेखाटताना त्यांच्यातला कर्मयोगी शाश्वत ध्येयाचा पाठलाग करताना दिसतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ कांदबरी स्वरूपात लिहिताना त्यांच्यातला विद्यार्थी सतत अध्ययन करीत राहिला. विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास घेणारे अिंगळे सर डॉ. कलामांच्या अग्निपंखांनी झेप घेत राहिले. त्यांनी आपल्या लेखनातून सातत्याने प्रेरणादीप तेवत ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज , संत तुकाराम,संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील अशा अनेक महापुरुषांच्या विचारांचा वारसा संपन्न करीत त्यांचा लेखनसंघर्ष कष्टकरी, कामगार, दलित व स्त्रियांच्या वेदनांना हुंकार घालतो. आयुष्यभर कर्मवीर मामांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्रतस्थ अिंगळे सर ‘शिक्षणपंढरीचा वारकरी: कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ‘ या चरित्र ग्रंथातून त्यांनी कर्मवीर मामांच्या कार्याचा परिचय वाचकांना करून दिल. त्यांच्या ‘ज्ञानतपस्वी’ या ग्रंथातून कर्मवीर मामांच्या व्यापक कार्याला दुजोरा मिळाला. ‘आविष्कार’ या काव्यसंग्रहातून त्यांनी समाजातील विविध स्तरांवरील लोकांना प्रबोधनाचे शब्द बहाल केले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले लेखन फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेचा पुरस्कार करते. संत परंपरेचा वारसा समृद्ध करीत वैज्ञानिकतेचा वेध त्यांची लेखणी घेत होती. बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून त्यांनी कर्मवीरांचा वसा घेतला व ‘वसा घेवूया कर्मवीरांचा’ हे त्यांचे काव्यवचन कायम लक्षात राहील. यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयास आपले ग्रंथ अर्पण करून ते ग्रंथगुरू ठरतात. आयुष्यभर परहितासाठी देह झिजवल्या नंतरही त्यांनी देहदान करून समाजासमोर आदर्श निर्माण करतात. त्यांना मसाप पुणे, जनसारस्वत अमरावती, कदम गुरुजी, कुर्डुवाडी आदी पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांच्या नावे मसाप शाखा बार्शी राजर्षी शाहू साहित्य पुरस्काराचे वितरण करते.त्यांच्या विपुल लेखन परंपरेत झेप अवकाशी अग्नीपक्ष्याची , दरिद्रीनारायण, शहीद भगतसिंग, नोबेल भूषण अमर्त्य सेन, पांग फिटे उकिरडयांचे (कांदबरी), महाराष्ट्राचे शिल्पकार: मामासाहेब जगदाळे, साम्यवादी संन्यासी, असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कांदबरी), इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा: इंग्रजी वाचणे, बोलणे, लिहिण्याच्या पॉवरफुल पद्धती (२०१५) संपादन : सौ. प्रतिमा भांड , सौ. चैताली शेट्टी, आविष्कार (२०१५) आदींचा समावेश होतो. ‘आविष्कार’ या काव्यसंग्रहातील ४७ वी कविता त्यांचे विचारदर्शन घडविते. ‘पेर्ते व्हा, पेरीत जा! एका वर्षाची तयारी करायची असेल तर,तर धान्य पेरा, बीजे पेरा, दहा वर्षाची तयारी करायची असेल तर, तर झाडे लावा, झाडे जगवा, शंभर वर्षांची तयारी करायची असेल तर, तर माणसे पेरा; माणसे, माणुसकी जागवा
व.न. अिंगळे यांच्या कार्याला कर्मवीर सलाम!

  • प्रा.राहुल पालके ( इंग्रजी विभाग,श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी)
Leave A Reply

Your email address will not be published.