चमत्कार दाखविल्याशिवाय जग नमस्कार करीत नाही, असे आपण नेहमी म्हणत असतो. या दुनियादारी’ला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. माध्यम जगत तर तथाकथित चिकित्सक, चोखंदळ आणि पारखी! अशा माध्यम जगतात यशस्वी होण्यासाठी सर्वकाही असूनही अनेक दिव्यातून जावे लागते. या दिव्यातून जाण्यासाठी देखील पारंपरिक मूलभूत पात्रता आणि निकष लावले जातात. त्यात पैशापासून शिक्षणा पर्यंतचे असंख्य विषय असतात.त्या माध्यम जगताच्या सर्वच निकष-नियमांना उतरंडीला लावून वृत्तपत्र क्षेत्रात यशस्वी होण्याचा या शतकातील चमत्कार एका बाबाने घडविला..!! तो बाबा म्हणजेच पुण्यनगरी माध्यम समूहाचे संस्थापक- संपादक मुरलीधर शिंगोटे तथा बाबा!
कुठल्याही पारंपारिक शिक्षणाच्या पदव्या नसलेले हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळम आणि मराठी दैनिकाचे यशस्वी मालक-संपादक बाबा! ऐहिक अर्थाने अशिक्षित असणारे बाबा वृत्तपत्रसृष्टीच्या अभ्यासकांसाठी मात्र एक विद्यापीठच बनले. एक छोटा वृत्तपत्र विक्रेता निष्ठा, कष्ट, आणि वाचकांची नाडी ओळखण्याच्या गुणवत्तेवर कुठल्याही भाषेत कसे चमत्कार करू शकतो,याचा वास्तुपाठच त्यांनी जगापुढे ठेवला संपादकीय आणि व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासकांना अचंबित करणारे असेच, यश त्यांनी संपादन केले..!!
आज बाबा गेल्याची बातमी कानावर पडली आणि मन सुन्न झाले. त्यांच्या सोबत आपल्याला राहण्याची व काम करण्याची संधी लाभली, त्यांचा सहवास लाभला, या माझ्या भाग्याचे माझे मलाच कौतुक वाटू लागले… दुःखी मन आपसूकपणे आनंद या सिनेमातील डायलॉग सांगू लागले….आनंद कभी मरते नाही..!!अगदी तस्सच.. बाबा कभी मरते नाही..बाबा कधी भरणार नाहीत.. कारण शिंगोटे बाबा हे नाव वृत्तपत्रसृष्टीत अजरामर झाले आहे.
बाबांची आणि माझी पहिली भेट २००३ साली झाली त्यावेळी मी सोलापुरात होतो. गप्पांच्या माध्यमातूनच त्यांनी त्यावेळी माझी मुलाखत घेतली. त्यात महत्त्वाचे प्रश्न होते ते राज्यभरातील अनेक गावांच्या वृत्तपत्र विक्रेत्यांची नावे पाण्यासंदर्भातील! माझी उत्तरे ऐकून बाबा खुश झाले लगेचच मला सोलापूरसह कोल्हापूर आणि कोकण आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणून काम सुरू करण्याचा आदेश दिला. त्यावेळी मी सोलापुरात राहू इच्छित नव्हतो. पहिले तीन-चार महिने मी सोलापुरात काम करेन, मात्र माझे काम आवडले तर नंतर कोल्हापूर पाठवावे लागेल, अशी विनंतीवजा अट मी घातली. बाबांनी तात्काळ होकार दिला. तिथून बाबांशी माझी नाळ जुळली ती कायमचीच!
मला आठवते त्याच काळात बाबा सोलापूरला आले होते. माझी आई-अक्का व पत्नी सौ मंदाला बाबांना घरी जेवायला बोलवावे असे मनोमन वाटत होते. मी बाबांना तसा आग्रह धरला. बाबांनी घरी आईला भेटायला येण्याचे मान्य केले. दिली ठरल्याप्रमाणे बाबा आमच्या घरी आले.माझ्या घरात प्रवेश करताच बाबांचे हात आपोआप माझ्या आईच्या पायांकडे झूकले. बाबांच्या या कृतीने आम्ही सगळेच भारावून गेलो. कौटुंबिक गप्पा झाल्या. जेवणार नाहीत तर डबा तरी घेऊन जा असा आग्रह माझ्या आईने त्यांच्याकडे धरला. त्यांनी तो मान्य केला आणि बाबांनीच मेनू सांगितला. हिरव्या मिरच्यांचा खर्डा आणि भाकरी! अक्षरशः ती कागदात गुंडाळून घेतली आणि दौर्यात माझ्या सोयीने खाईन असा शब्द माझ्या आईला दिला आणि तो पाळला..
त्यांच्यासोबत मला अनेक दौरे करण्याची संधी मिळाली. त्यांचे चिरंजीव अरविंद यांच्या सोबत देखील कोल्हापूर जिल्ह्यातील खेडोपाडी फिरलो. वाचकांची नाडी शोधणे हा मूलमंत्र बाबांनी अरविंद यांनाही दिल्याचे दिसून आले. कष्ट, जिद्द, विनय आणि सातत्य हे बाबाच्या व्यक्तिमत्वातील महत्वाचे धागे मला अभ्यासायला मिळाले.त्या धाग्यांना त्यांनी आपल्या हळव्या स्वभावाने दिलदारीची जोडी दिलेली होती त्यामुळे बाबा कोणाला कितीही रागावले तरी वाईट वाटत नसायचे. त्यांच्या सहवासात येणारा माणूस कायमचा त्यांचाच व्हायचा. दिखाऊपणा त्यांच्या आसपासही फिरकू शकला नाही.किंबहुना त्याच्यावर बाबांच्या विनयानेच मात केली.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्याची संधी मला लाभली. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते तो पुरस्कार बहाल करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर बाबा दाखल झाले. त्यांनी प्रथम विजयबाबू यांचे दर्शन घेतले. बाबांची ती कृती पाहून उपस्थित असलेले शेकडो आश्चर्यचकित झाले. पण प्रत्येकाने बाबांच्या विनयशील आणि दिलदारीला सलाम केला.. वृत्तपत्र सृष्टीत चमत्कार घडवून अजरामर झालेल्या आमच्या प्रिय शिंगोटे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
राजा माने