Latest Marathi News

BREAKING NEWS

बाबांनी रोजी-रोटी अन डोळ्यांचे वरदान देऊन पुन्हा जग दाखवलं…

0

वर्ष होतं 2002… वाई मधील तांबडी माती सप्ताहिकामध्ये 2 वर्षे काम केल्यावर काही चांगल्या-वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन वयाच्या 20व्या वर्षी साताऱ्याकडे रोजी-रोटीसाठी वळलो. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत नियतीने अनेक जिव्हारी लागणारे घाव दिले होते. अशा घायाळ मनाने साताऱ्यातील काही दैनिकांच्या कार्यालयाना कामासाठी भेटी दिल्या. एका दैनिकात डीटीपी विभागात काम मिळालं. तिथं काम करीत असतानाच एका पत्रकार मित्रानं साताऱ्यात नवीन दैनिक पुण्यनगरी सुरू होणार असल्याची माहिती दिली व तिथे कामासाठी भेटण्याचा सल्ला दिला. इथल्यापेक्षा थोडा वाढवून पगार भेटला तर पुढचं ठरवू असं मनाशी ठरवून मी मित्राने सांगीतलेल्या ठिकाणी गेलो. ऑफिसचं काम सुरू होतं. काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कामगारास भेटण्यासंबंधी विचारल्यावर त्याने मला तेथील व्यवस्थापक रमेश गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचवले. गायकवाड नाव ऐकल्यावर जीव थोडा हलका झाला. भेटल्यावर त्यांनी मला अर्ज व बायोडाटा मागितला. थोड्याशा गोंधळलेल्या मनस्थितीत त्यांना मी फक्त भेटण्यासाठी व माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी थोडंसं माझ्याकडे दुर्लक्ष करीत कोणत्याही कामासाठी भेटण्याचे असल्यास अर्ज व बायोडाटा घेऊन येण्याबाबत सांगितलं. मी उठून जाणार तेवढ्यात एक भारदस्त आवाज कानावर आला, अरे रमेश कोण आलंय भेटाय… बाबा, एक मुलगा नोकरीसाठी विचारपूस करतोय. बाबांनी सांगितलं, रमेश त्याला आतमध्ये पाठव. हे ऐकल्यावर व्यवस्थापकांनी मला आतमध्ये दैनिक पुण्यनगरी पेपरचे मालक बाबा बसले आहेत व त्यांनी तुला भेटण्यास बोलावलं आहे असं सांगितलं. हे ऐकून मी दबकतच त्यांच्या दिशेने गेलो. फर्निचरच काम सुरू असल्याने आतमध्ये ते एका खुर्चीवर वृत्तपत्र वाचत होते. मला त्यांनी दुसरी खुर्ची घेऊन बसण्यास सांगितलं. मला आजही आठवतं, त्यांचा पहिला प्रश्न होता तुला काय काम येतं? मी सांगितलं मला डिटीपीचं काम चांगलं येतं व बातमी कशी तयार करायची याचीही माहिती आहे. मला 2 वर्षाचा अनुभव आहे मात्र मी आज अर्ज व बायोडाटा सोबत आणला नाही. त्यावर बाबा म्हणाले तो समोर कॉम्पुटर आहे, तो सुरू कर आणि त्याच्यावर बातम्या टाईप कर अन मला दाखव.

पेजमेकरमध्ये पानभरून बातम्या टाईप झाल्यावर मी बाबांना दाखवलं. बाबांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकली अन म्हणाले छान, अरे रमेश हा पोरगा कामाचा आहे, याची माहिती घे आणि त्याला उद्यापासून कामाला यायला सांग. मी उध्या पगाराच बोलतो…. दुसऱ्या दिवशी मी दिलेल्या वेळेत पोहोचलो, व्यवस्थापक रमेश गायकवाड यांनी माझी संपादक, उपसंपादक यांची ओळख करून दिली व माझे काम सुरू झाले. काही वेळानंतर बाबा आले, त्यांनी मला बोलाऊन विचारलं… आधी किती पगार होता? मी सांगणार इतक्यात थांबलो… बाबा म्हणाले असुदेत, तिथल्यापेक्षा इथं 500 रुपये जास्त देतो, पण काम चांगलं कर… हे ऐकून मीही मान डुलवत होकार दिला. अर्ज अन बायोडाटाशिवाय चांगल्या कामाला, कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलेला महत्व देणाऱ्या बाबांनी माझ्यासारख्या नियतीने दुःखाच्या खाईत लोटलेल्या तरुणाला रोजीरोटी देत भावी आयुष्याचा राजमार्ग दाखवला. बाबांनी दिलेलं ते नोकरीरूपी वरदानच होतं.

वर्ष होतं 2006… दैनिक पुण्यनगरीची कोल्हापूर आवृत्ती 2003 साली सुरू केल्याने मी तेव्हापासून कोल्हापूरमध्ये काम करीत होतो. एकदिवस रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास काम संपवून प्रेसच्या गाडीने गावी पाचवडला येत होतो तेंव्हा कराड शेजारील आटके फाट्यापाशी आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडीमधील माझ्यासह अन्य तिघे जखमी झाले होतो. या अपघातात मला जरा जास्त लागल्याने माझी स्थिती गंभीर झाली होती व मी सलग दोन दिवस बेशुद्ध राहिलो होतो. अपघातात माझ्या डाव्या डोळ्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बाबा कराडच्या कृष्णा हॉस्पीटलमध्ये आले. माझ्या तब्येतीची चौकशी केल्यावर त्यांना समजलं की माझ्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे व कदाचित त्या डोळ्याने भविष्यात मला दिसू ही शकणार नाही. हे कळताच बाबांनी मला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे ठरवले. त्यावेळचे पुण्यनगरीचे संपादक राजा माने साहेब हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर बाबांनी डॉक्टरांना सांगितले काही झालं, कितीही पैसे लागले तरी चालतील मात्र माझ्या मुलाला डोळ्याने चांगले दिसले पाहिजे.

एक संपूर्ण दिवस माझ्या डाव्या डोळ्याचे परीक्षण करून डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे ठरवले. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी बाबांना ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले …. हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला मात्र त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेले माझे कुटुंबीय, सहकारी व हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी या सर्वांची मने भरून आली, सर्वांच्या डोळ्यांच्या पापण्या अश्रूंनी भरल्या कारण आपल्या एका कर्मचाऱ्यासाठी, त्याला डोळ्याने पुन्हा जग पाहावे यासाठी दैनिक पुण्यनगरीचे मालक, आमच्या सर्वांचे बाबा ऑपरेशन दिवशी दिवसभर माझ्या डोक्याशी बसून होते. बाबांनी मला दुसऱ्यांदा माझ्या डोळ्यांनी जग दाखवलं अन त्यादिवशी फक्त एक मिरची भाजीची प्लेट खाऊन मला पुन्हा उघड्या डोळ्याने जग पाहण्याचं वरदान दिलं.
अरे गायकवाड, या दुनियेत स्वतःचं अस्तित्व निर्माण कर असं सतत सांगणारे बाबा आज आपल्यात नाहीत मात्र माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्यांनी घडवले, जीवनाला नवी दिशा देत जगण्याची कला शिकवली. अनेकांना आपल्या छत्रछायेत घेवून मोठे केले. एक वृत्तपत्र विक्रेता ते दैनिक पुण्यनगरी, मुंबई चौफेर, वार्ताहर, यशोभूमी व अन्य वृत्तपत्राचे मालक असा त्यांचा वृत्तपत्रसृष्टीतील यशस्वी प्रवास हा थक्क करणारा आहे.

बाबांची शिकवण, संस्कार व आजन्म कष्ट करण्याची दिलेली शिदोरी नेहमीच मला व माझ्यासारख्या अन्य सहकार्यांना पुढील जीवन जगताना प्रेरणादायी ठरणार आहे. बाबांच्या अनेक आठवणींचा खजिना, त्यांचे वरदान दररोज पुण्यनगरी हातामध्ये घेतल्यावर माझ्यासह सर्व कुटुंबियांच्या सदैव स्मरणात राहील…
अश्रूपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली

महेंद्र गायकवाड (पाचवड, ता.वाई)

Leave A Reply

Your email address will not be published.