Latest Marathi News

BREAKING NEWS

नव्याने स्वत:चा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना बँकेकडून असणारी अपेक्षा जनता सहकारी बँक पूर्ण करेल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे, १८ ऑक्टोबर : बालगंधर्व रंगमंदिर येथे जनता सहकारी बँक लि. पुणेच्या अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी भूषण स्वामी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पुणे जनता सहकारी बँकेने अडचणीत असताना उद्योगांना सहकार्य केले. सहकारी क्षेत्रातील बँकांमुळे सर्वसामान्य माणसाला गरजेच्यावेळी आर्थिक सहाय्य मिळते. राज्यात सर्वसामान्य माणसाला व्यवसाय सुरू करण्यास सहकारी बँकांनी मदत केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ७० हजार युवक-युवतींना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासोबत इतरांनाही रोजगार देता आला. नव्याने स्वत:चा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना बँकेकडून असणारी अपेक्षा जनता सहकारी बँक पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी काळात लहान स्वरूपातील कर्ज देण्यावर भर द्यावा, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक गरज लक्षात घेऊन सहकारी बँकांची सुरुवात करण्यात आली. या वित्तीय संस्थांनी लोकांचा विश्वास संपादन केला. सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्वाचे असून अशा भावनेतून काम करणारी संस्था मोठी होते, याचेच उत्तम उदाहरण जनता सहकारी बँक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.