उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास दिली भेट
मुंबई , १८ ऑक्टोबर :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भेट दिली. दरम्यान, महामंडळाच्या कामकाजाविषयक आणि इतर बाबींवर त्यांनी आज सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष,माजी आमदार नरेंद्र पाटील,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनांना सर्वोत्तम प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाने २३ हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना २५ कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कमेचा व्याज परतावा केला आहे. यानुषंगाने आज ६ हजार लाभार्थ्यांना रु. ४.६५ कोटीचा व्याज परतावा ऑनलाईल स्वरुपात वितरीत केला. विशेष म्हणजे महामंडळाने आतापर्यत पाचशे चोपन्न कोटी पेक्षा अधिकचे अर्थसहाय्य व्याज परतावा स्वरुपात राज्यातील मराठा समाजाकरिता दिले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
सद्य:स्थितीत महामंडळाकडे व्याज परताव्याचे एकही प्रकरण प्रलंबित नाही. काल दि १७ ऑक्टोबर रोजी एका दिवसांत २३ हजार ६८५ लाभार्थ्यांना रु. २०.२९ कोटीचा व्याज परतावा महामंडळाने केला आहे. आनंदाची बाब म्हणजे या योजनांच्या माध्यमातून राज्यभरात ७० हजार पेक्षा जास्त मराठा उद्योजक तयार झाले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.