‘जबाबदार पदावरील व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा…’; रोहित पवारांनी राज्यपालांना सुनावले खडेबोल
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून विविध स्थरातून तसेच राजकीय पक्षाकडून टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढं ठेवून मुंबईसंदर्भात काल राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही. कारण आजवर IFSC सेंटर, बुलेट ट्रेन, शिपयार्ड (ही लांबलचक यादी आहे) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आहे, असं रोहित पवार म्हणाले.
तसेच आता तर मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मुंबईचं आजचं स्थान हे सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे आहे. पण त्यात भेदभाव करुन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असं म्हणायलाही कदाचित भेदभाव करणारे कमी करणारा नाहीत. वास्तविक सर्वांना सामावून घेण्याइतकं समुद्रासारखं विशाल मन मुंबई व महाराष्ट्राचं आहे. याचा गैरफायदा घेत समुद्राच्या काठावर राहणाऱ्या मोठ्या व्यक्तीकडून मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि भाषा व प्रांतवाद निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न दुर्दैवी व महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.