नागपूर-पणजी (गोवा) नवीन द्रुतगती मार्गाच्या प्रस्तावित आखणीत ‘या’ गोष्टी समाविष्ट करा : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील
अकलूज |
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या भरीव सुधारणा करून महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रतिष्ठेचा असणारा मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.
नागपूर ते पणजी (गोवा) हा नवा महामार्ग घोषित करण्यात आला आहे. भारतातील पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी हा महामार्ग खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या नागपूर पासून गोव्याला जाण्यासाठी वर्धा, येवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर, मिरज, कोल्हापूर येथून म्हापसा गार्गे पणजी (गोवा) असा प्रवास करावा लागतो. या प्रवासाचे अंदाजे अंतर ९९० किमी आहे आणि प्रवासासाठी सुमारे २० तास लागतात. सदर नवीन नागपूर ते पणजी महामार्गाच्या प्रस्तावित आखणीसाठी महाराष्ट्रातील अविकसित क्षेत्र आणि तीर्थक्षेत्रे समाविष्ट केल्यास अविकसित क्षेत्रासाठी ते उपयुक्त ठरेल. नागपूर पासून बुटीबोरी, वर्धा, महागाव, अर्धापूर, अंबाजोगाई, (परळी वैजनाथ), कुर्डवाडी, अकलूज, म्हसवड, विटा, कोल्हापूर ते पणजी (गोवा) अशी या मार्गाची आखणी करावी अशी मागणी पत्राद्वारे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यामुळे महामार्गाची लांबी तसेच प्रवासाचा वेळही कमी होईल. यामध्ये रेणुका माता देवी माहूर, योगेश्वरी देवी अंबाजोगाई, वैद्यनाथ मंदिर परळी वैजनाथ, महालक्ष्मी
मंदिर कोल्हापूर आणि इतर तीर्थक्षेत्रे समाविष्ट असणार आहेत. नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित सुरत- चेन्नई द्रुतगती ग्रीन फील्ड महामार्ग आणि प्रस्तावित पुणे-बेंगलोर द्रुतगती ग्रीन फील्ड महामार्गास क्रॉस करतो. त्यामुळे लांब पल्ल्याची वाहतुक सुलभ होणार आहे.