गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. सलग सात वेळा भाजपने सत्ता काबीज केली आहे. गुजरातमध्ये भाजपने सर्वाधिक १५६ जागा मिळवल्या आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागलं आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या हातून सत्ता गेली आहे. तिथे काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला ४० जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २५ जागा मिळवत्या आल्या.
यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांना टोला हाणला आहे. अजित पवार म्हणाले, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना आपल्या राज्यात पराभव स्वीकारावा लागला. हिमाचल प्रदेश हे नड्डा यांचे राज्य असून, ते तेथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवतात. ही त्यांची नामुष्की आणि कमीपणा नाही का?. मात्र, भाजपने गुजरातमध्ये जोर लावला होता. सर्वात जास्त बहुमत भाजपला यंदा मिळाले, असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या खासदारांनी सीमावादावरून गृहमंत्री अमित शहांना पत्र दिले आहे. पण, एकीकडे बोम्मई हे शांततेच आवाहन करून परत भडकवण्याचे काम करतात. आज देखील कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिका’ संघटनेकडून कर्नाटकात ‘हम करेसो कायदा’ असे वागले जाते, असा आरोप अजित पवारांनी केला.