महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विराेधी नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शंभूराजे देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर धमकीचे फोन येत असल्याचे म्हटले आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला धमकीचे फोन आले हे सांगण्यास चाेवीस तास का लागले? असे त्यांनी विचारले.
देसाई पुढे म्हणाले की, “संजय राऊत यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी. त्यांच्यात काेणत्याही प्रकारचे धाडस नाही हे यापुर्वीच सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. आता चाेवीस तासांनंतर राऊत म्हणतात, मला धमकीचे फोन आले. त्यांना माध्यमांसमोर येऊन सांगायला चाेवीस तास का लागले? असा प्रश्न त्यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. “कुणी कितीही यात्रा काढल्या, कुणाच्या पाठीमागे राहायचा प्रयत्न केला, कुणाच्या हातात हात घालून चालले, तरी काही फरक पडत नाही. हे आजच्या निकालानंतर स्पष्ट होईल.” असा टोला त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मारला.