विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा ; दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो
मुंबई |
दिव्यांच्या प्रकाशाचा सण दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील रोषणाईच्या प्रकाशात समाजातलं अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेचा अंध:कार दूर होवो. प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवरची महाराष्ट्राची वाटचाल अखंड राहो. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, आरोग्य अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल राहो. बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांचा हातभार लागो. सर्वांच्या हातून सत्कर्म घडो. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा मुक्त वातावरणात साजरा होत असलेला दिवाळीचा सण समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन आनंद, उत्साहाच्या वातावरणात साजरा करुया…” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “दिवाळी हा सर्वांनी एकत्र येऊन कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवारासोबत साजरा करायचा सण आहे. कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांचीही दिवाळी गोड, आनंदी करण्याचा प्रयत्न करावा. समाजात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करावा.” राष्ट्रवादी कांग्रेस पक्षासह अनेक संस्था, संघटना आणि व्यक्ती त्यांच्या स्तरावर दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरीब, दुर्बल घटकांपर्यंत दिवाळीचा फराळ, नवीन कपडे पोहचवण्याचा उपक्रम राबवतत आहेत. अनेक संस्था सीमेवरील सैनिकांपर्यंत दिवाळीचा फराळ आणि कृतज्ञतेच्या भावना पोहचवत आहेत. यातूनंच समाजात एकता, बंधुता, आपुलकीचा भावना वाढीस लागणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी अशा संस्थांचे अभिनंदन केले आहे. यंदाची दिवाळी ही मनातील द्वेष, कटुता, असूया, मनभेद, मतभेद दूर सारुन सर्वांनी एकदिलानं, आनंदानं, उत्साहानं साजरी करुया, असं आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.